सत्तरीच्या दशकात एकांकिका स्पर्धांचे जे पेव फुटले होते त्यामधील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली चमक दाखविण्यास सुरुवात केली. सीताराम पालव लिहीत आणि अनिल सावंत दिग्दर्शित “खुर्ची” या एकांकिकेनं चिंतामणराव कोल्हटकर स्पर्धेपासून पुन्हा एकदा संस्थेनं नाट्य विभागाची सुरुवात केली. पुढे मयासूर क्रांती अर्थात क्रांती बांदेकर यांच्या “गुंतलेले हितसंबंध”, “तमाशेबाज”  या एककांकिकांचे प्रयोग गाजले. या तालमीतून रवीकिरणचे सभासद श्री विजय टाकळे हे लिहिते झाले. त्यांनी लिहिलेल्या “माणसांची गोष्ट”, “ढोल वाजतोय”, “शेवाळ शोधतंय क्लोरोफिल”, “कु कुss  च कु “,  “काँक्रीट जंगल”, “व्हिक्टीम” या एकांकिकांनी विविध  स्पर्धांत भरघोस असे यश मिळविले. “ढोल वाजतोय” या एकांकिकेने तर इतिहासच निर्माण केला. ज्या ज्या स्पर्धेत हि एकांकिका सादर झाली तिथल्या बहुतांशी स्पर्धेत ती सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली. पुढे तिचे दूरदर्शनला प्रक्षेपण झाले आणि ती एकांकिका छोट्या पडद्यावर पाहून पुढे तिचे मोठ्या पडद्यावर चित्रपट स्वरूपात “और ढोल वाजता रहा” या नावाची डॉक्युमेंट्री फिल्म तयार करण्यात आली. पुढे रविकिरण संस्थेने विजय टाकाळे यांच्या गाजलेल्या पाच एकांकिकेचं “ढोल वाजतोय” आणि चार एकांकिका असं पुस्तक प्रकाशित केलं त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखनाचा पुरस्कारही मिळाला.

या एकांकिकेनं जसा रंगभूमीला लेखक तर दिलाच तसा अविनाश नारकर सारखा चांगला दिग्दर्शक आणि सध्या नाटक, मालिका चित्रपट यात गाजत असलेला कलाकारही दिला. १९८७ साली संस्था नोंदणीकृत झाली. आणि संस्थेचा अधिकच वाढला. संस्थेने केवळ नाट्य विभागच नव्हे तर क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , अशा विविध क्षेत्रात आपले काम सुरु केले. महत्वाचे म्हणजे एकांकिका करत असताना त्याकाळी प्रायोगिक रंगभूमीवर गाजत असलेल्या विनायक पडवळ या दिग्दर्शकाचा संस्थेशी अतिशय जवळचा संबंध आला आणि पुढे राज्य नाट्यस्पर्धांमध्ये विजय टाकळे यांची तीन अंकी नाटके विनायक पडवळ यांच्या दिग्दर्शनाखाली  स्पर्धेत सहभागी होऊ लागली. “आठ बाय दहा” या नाटकाचा प्रयोग पाहून ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांनी त्यांच्या लोकप्रिय रसरंग या अंकात लिहिलेल्या नाट्य समीक्षणामध्ये असे नाटक गेली २५ वर्षे पहिले नसल्याची कबुली देऊन प्रशंसा केली.