रविकिरण संस्थेने १९८४ साली “बालनाट्य स्पर्धेची” सुरुवात केली. पूर्वी बालनाट्य स्पर्धा हि केवळ शाळांसाठी मर्यादित होती आणि त्या स्पर्धा घेणाऱ्या मोजक्याच संस्था होत्या. लिटिल थिएटर, कुमार कला केंद्र, बाल्कनजी बारी या स्पर्धक संस्थांमध्ये आणखी एका संस्थेची भर पडली ती म्हणजे “रविकिरण संस्थेची” परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की, स्पर्धा शाळा तसेच संस्थांनाही खुली होती आणि हि राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्यामुळे या स्पर्धेत मुंबई, ठाणे, अंबरनाथ, विरार याचबरोबर पुणे, नाशिक येथील शाळा संस्थांचा सहभाग होता. या स्पर्धांमध्ये संस्थेनं विविध प्रयोग करण्याचे ठरविले त्या प्रमाणे ते केले देखील, स्पर्धा संपल्यानंतर थेट परीक्षकासोबत विजेते आणि पराभूत अशा दोन्ही स्पर्धकांची आमने सामने भेट करून निकालाचे पोस्ट-मार्टेम केले जात होते. या स्पर्धेच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मुलांसाठी तसेच शिक्षकांसाठी लेखन स्पर्धा घेतली. तिला सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी तसेच लेखक व अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी विषय दिले होते. हि स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली आणि विशेष म्हणजे या स्पर्धेला मुंबई बाहेरून अधिक प्रतिसाद मिळाला. नाट्य समीक्षक हे त्याचे परीक्षक होते. आज हि स्पर्धा ३६ वर्षे पूर्ण करतेय.
बालनाट्य स्पर्धा निकाल – वर्ष निवडा