करीरोड पुलाशेजारी संभू कामाठीची चाळ पुढे तिचं नामकरण गुप्ता इस्टेट चाळ असं झालं. या चाळीतल्या कबड्डी खेळानं झपाटलेल्या काही तरुणांनी १९५८साली “रविकिरण क्रीडा मंडळ” या संस्थेची स्थापना केली. तरुण सहकायांच्या मदतीनं या संस्थेची मुहूतरमेढ रोवली आणि कबड्डीची पंढरी ठरलेल्या कामगार विभागात क्रीडा विषयक उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर साधारणतः १९६९-७०च्या आसपास संस्थेने तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या नाट्य विभागाची सुरुवात केली. दिवाळी स्नेहसंमेलनाचे आयोजन करून त्यानिमित्तानं विविध नाटिका, नृत्य, जादूचे प्रयोग इ. कार्यक्रम करून या संस्थेला कलात्मकतेची डूब दिली. संस्थेनं क्रिकेट या खेळाला प्राधान्य दिलं आणि अल्पावधीतच क्रिकेटच्या टेनिस बॉल स्पर्धेत दबदबा निर्माण केला. पुढे संस्थेने क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमधे पारितोषिके पटकावली. त्यानंतर स्वतः क्रिकेटच्या टुर्नामेंट्स आयोजित केल्या. त्या कालावधीत अनेक क्रिकेटपटू तयार करून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं काम रविकांत राणे यांनी केलं पुढे त्यातील काही खेळाडूंना खेळाडू कोट्यातून बँकेमध्ये नोकरीही मिळली आणि रविकांत राणे यांचं क्रीडा क्षेत्रातलं काम पाहून पुढे महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोत्कृष्ट कबड्डी प्रशिक्षक म्हणून छत्रपती पुरस्काराने गौरविले.
१९७७ नंतर पुन्हा एकदा संभू कामाटी चाळीचं अर्थात गुप्ता इस्टेट चाळीचं रूपांतर म्हाडानं नमुना म्हणून तयार केलेल्या सेल्फ कंटेन्ड इमारतीत झालं आणि रविकिरण संस्था आणि तिचे सभासद नव्या वास्तूत येऊन राहू लागले. पुढे या नूतन ईमातीला “साफल्य” हे नाव ठेवले गेले आणि मग मधल्या कालावधीत जो नाट्य विभाग थंडावलेला होता तो पुनरुज्जीवीत होऊन त्याने सत्तरीच्या दशकात एकांकिका स्पर्धांचे जे पेव फुटले होते त्यामधील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली चमक दाखविण्यास सुरुवात केली. सीताराम पालव लिहीत आणि अनिल सावंत दिग्दर्शित “खुर्ची” या एकांकिकेनं चिंतामणराव कोल्हटकर स्पर्धेपासून पुन्हा एकदा संस्थेनं नाट्य विभागाची सुरुवात केली. पुढे मयासूर क्रांती अर्थात क्रांती बांदेकर यांच्या “गुंतलेले हितसंबंध”, “तमाशेबाज” या एककांकिकांचे प्रयोग गाजले. या तालमीतून रवीकिरणचे सभासद श्री विजय टाकळे हे लिहिते झाले. त्यांनी लिहिलेल्या “माणसांची गोष्ट”, “ढोल वाजतोय”, “शेवाळ शोधतंय क्लोरोफिल”, “कु कुss च कु “, “काँक्रीट जंगल”, “व्हिक्टीम” या एकांकिकांनी विविध स्पर्धांत भरघोस असे यश मिळविले. “ढोल वाजतोय” या एकांकिकेने तर इतिहासच निर्माण केला. ज्या ज्या स्पर्धेत हि एकांकिका सादर झाली तिथल्या बहुतांशी स्पर्धेत ती सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली. पुढे तिचे दूरदर्शनला प्रक्षेपण झाले आणि ती एकांकिका छोट्या पडद्यावर पाहून पुढे तिचे मोठ्या पडद्यावर चित्रपट स्वरूपात “और ढोल वाजता रहा” या नावाची डॉक्युमेंट्री फिल्म तयार करण्यात आली. पुढे रविकिरण संस्थेने विजय टाकाळे यांच्या गाजलेल्या पाच एकांकिकेचं “ढोल वाजतोय” आणि चार एकांकिका असं पुस्तक प्रकाशित केलं त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखनाचा पुरस्कारही मिळाला.
या एकांकिकेनं जसा रंगभूमीला लेखक तर दिलाच तसा अविनाश नारकर सारखा चांगला दिग्दर्शक आणि सध्या नाटक, मालिका चित्रपट यात गाजत असलेला कलाकारही दिला. १९८७ साली संस्था नोंदणीकृत झाली. आणि संस्थेचा अधिकच वाढला. संस्थेने केवळ नाट्य विभागच नव्हे तर क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , अशा विविध क्षेत्रात आपले काम सुरु केले. महत्वाचे म्हणजे एकांकिका करत असताना त्याकाळी प्रायोगिक रंगभूमीवर गाजत असलेल्या विनायक पडवळ या दिग्दर्शकाचा संस्थेशी अतिशय जवळचा संबंध आला आणि पुढे राज्य नाट्यस्पर्धांमध्ये विजय टाकळे यांची तीन अंकी नाटके विनायक पडवळ यांच्या दिग्दर्शनाखाली स्पर्धेत सहभागी होऊ लागली. “आठ बाय दहा” या नाटकाचा प्रयोग पाहून ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांनी त्यांच्या लोकप्रिय रसरंग या अंकात लिहिलेल्या नाट्य समीक्षणामध्ये असे नाटक गेली २५ वर्षे पहिले नसल्याची कबुली देऊन प्रशंसा केली. अनेक क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना रविकिरण संस्थेने १९८४ साली “बालनाट्य स्पर्धेची” सुरुवात केली. पूर्वी बालनाट्य स्पर्धा हि केवळ शाळांसाठी मर्यादित होती आणि त्या स्पर्धा घेणाऱ्या मोजक्याच संस्था होत्या. लिटिल थिएटर, कुमार कला केंद्र, बाल्कनजी बारी या स्पर्धक संस्थांमध्ये आणखी एका संस्थेची भर पडली ती म्हणजे “रविकिरण संस्थेची” परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की, स्पर्धा शाळा तसेच संस्थांनाही खुली होती आणि हि राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्यामुळे या स्पर्धेत मुंबई, ठाणे, अंबरनाथ, विरार याचबरोबर पुणे, नाशिक येथील शाळा संस्थांचा सहभाग होता. या स्पर्धांमध्ये संस्थेनं विविध प्रयोग करण्याचे ठरविले त्या प्रमाणे इ केले देखील, स्पर्धा संपल्यानंतर थेट परीक्षकासोबत विजेते आणि पराभूत अशा दोन्ही स्पर्धकांची आमने सामने भेट करून निकालाचे पोस्ट-मार्टेम केले जात होते. या स्पर्धेच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मुलांसाठी तसेच शिक्षकांसाठी लेखन स्पर्धा घेतली. तिला सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी तसेच लेखक व अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी विषय दिले होते. हि स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली आणि विशेष म्हणजे या स्पर्धेला मुंबई बाहेरून अधिक प्रतिसाद मिळाला. नाट्य समीक्षक हे त्याचे परीक्षक होते. आज हि स्पर्धा ३५ वर्षे पूर्ण करतेय. गिरणगावात रविकिरण संस्थेनं आपल्या विविध उपक्रमांनी स्वतंत्र असं स्थान निर्माण केलं आहे.
दिवाळीत वार्षिक स्नेहसंमेलन सुरु करून दिवाळीच्या चार दिवसात मुलांनी फटाके वाजवू नयेत व आपल्या पालकांनी कष्टाने मिळवलेला पैसा वाया जाऊ नये म्हणून रविकिरण संस्थेनं आजतागायत स्नेहसंमेलनची परंपरा निर्माण केली. या चार दिवसात विविध स्पर्धा, नृत्य, एकांकिका, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल करून केवळ हा कार्यक्रम इमारतीपुरता मर्यादित न ठेवता याचा आस्वाद आजूबाजूचे रहिवाशी हि नियमितपणे घेत आहेत. आज होम मिनिस्टर या मालिकेचा लेखक महेंद्र कदम, विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी ह्यांसारख्या होतकरू कलाकारांना रविकिरण संस्थेने व्यासपीठ निर्माण करून दिलं. सध्याचा आघाडीचा विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांसारखी कितीतरी नावे सांगता येतील.
सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेला कायद्याचं ज्ञान मिळावं व आपला हक्क आपल्याला मिळवताना अडचण येऊ नये म्हणून पोलीस व्याख्यानमाला कित्येक वर्षे राबवली. राजकीय मुद्यांवरील परिसंवादाचे आयोजन करून लोकांमध्ये आत्मभान निर्माण करण्याचे काम केले. तर लोक प्रतिनिधींना थेट रस्त्यावर उभे करून लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केला.
विविध क्षेत्रात काम करताना आज संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय. गेल्या पन्नास वर्षात संस्थेनं शासनाचं अनुदान न घेता प्रसंगी पदरमोड करून हे उपक्रम राबवत आहेत. सर्व सभासदांच्या आणि हितचिंतकांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झालं.